...नाहीत तर महारष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, राज ठाकरेंचा राज्यपालांवर घणाघात
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अनेक दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. अशातच आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा गोरेगावमधील नेस्को सभागृहात गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या सभेत बोलत असताना राज ठाकरेंनी राज्यपालांच्या चांगलाच समाचार घेतला. "आपलं वय काय? आपण बोलतोय काय? काय चाललंय या महाराष्ट्रात? राज्यपाल पदावर बसलाय म्हणून मान राखतोय. नाहीत तर महारष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी यावेळी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. “महाराष्ट्रातली उद्योगधंदे गुजरातला चालले आहेत. त्यावर आमचं धोतर बोललं नाही का? कोश्यारी, वय काय, बोलतोय काय, काय चाललंय? राज्यपाल पदावर बसलायत म्हणून मान राखतोय. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही”, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
गुजराती आणि मारवाडी लोक महाराष्ट्रातून बाहेर गेले तर काय होईल? या राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. "गुजरातच्या आणि मारवाड्यांना प्रथम विचारा की, तुमच्या राज्यातून उद्योगासाठी तुम्ही महाराष्ट्रात का आलात? उद्योग धंद्यांसाठी महाराष्ट्रात सुपीक जमीन आहे म्हणून दुसऱ्या राज्यातील लोक येथे उद्योगांसाठी येत आहेत. महाराष्ट्र मोठा होता आणि तो कायम मोठा राहिल. महाराष्ट्रात काय आहे हे कोश्यारींकडून ऐकायचं नाही, असा टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.
तुम्ही उद्योगपती आहात, व्यापारी आहात मग तुमच्या राज्यात तुम्ही व्यापार का केला नाही? महाराष्ट्रात का आलात? उद्योग धंदे थाटण्यासाठी आणि व्यापारासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा आहे. हा देश नव्हता त्यावेळी या भागाला हिंद प्रांत म्हटलं जात होतं. या हिंद प्रांतावर अनेक आक्रमने झाली. पण हिंद प्रांतावर मराठेशाहीने सव्वाशे वर्षे राज्य केलं. महाराष्ट्र पहिल्यापासूनच समृद्ध होता. आज जर या गुजराती आणि मारवाडी लोकांना सांगितलं की, आता तुमच्या राज्यात जाऊन उद्योग करा. तर हे जातील का? आजही परदेशातील कोणताही उद्योग देशात आणायचा असेल तर पहिल्यांदा महाराष्ट्राला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे आपण म्हणतो येथील उद्योग बाहेर गेले. पण हल्ली कोणी येतंय आणि काहीही बरळतंय, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.