राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देतं का? राज ठाकरेंचा सवाल
नुकताच मुंबईतील नेस्को येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्वच राजकीय विषयावर भाष्य करत चौफेर टीका केली होती. त्यावेळी देखील राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारींवर टीका केली होती. मात्र, आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा कोश्यारींवर निशाणा साधला आहे. मला तर असं वाटतं की अशा लोकांना म्हणजे राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देतं का? असे राज ठाकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे?
कोल्हापूर दौऱ्यावर असताना माध्यमांसमोर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “राजकारणात असे अनेक लोकं आहेत जी काही पदांवर बसलेली आहेत. असे अनेक माणसं आहेत, ज्यांना पद येते पण पोहोच येत नाही. त्यातली ही माणसं आहे. पदावरती बसतात पण कधी कुठली गोष्टी काय बोलावं याबद्दल कळत नाही. मागच्यावेळी ते जोतिबा फुले आणि महात्मा फुले यांच्याबद्दल बोलले होते. हे छोटे-छोटे बच्चे तब ये शादी करते, कैसे करते होगे? कैसे म्हणजे पूर्वीच्याकाळी लहान मुलांचं लग्न व्हायचं. कोश्यारींचं अजून नाही झालं”, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी केली.
“मला तर असं वाटतं की अशा लोकांना म्हणजे राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देतं का? तुमचं सगळं लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत का? बऱ्याचदा महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे असे प्रकार केले जातात. मुर्ख माणसं आहेत. आपल्या महाराजांना याने काही फरक पडत नाही. ही कोण माणसं आहेत? या लोकांना टेलिव्हिजनवर जागा देऊ नका. पण तुम्ही थांबत नाहीत”, असं राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले.