राहुल गांधींच्या 'त्या' विधानावरून मनसे आक्रमक; राज ठाकरेंचे आदेश, मनसैनिकांनो उद्या...
मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकारांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप-शिंदे गटाकडून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. तर, ठिकठिकाणी आंदोलनेही करण्यात येत आहेत. आता या वादात मनसेनेही उडी घेतली असून उद्या सर्व मनसैनिकांना शेगावमध्ये जमण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे.
राहुल गांधीच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा उद्या बुलढाण्यात असून राहुल गांधींचे भाषण होणार आहे. या ठिकाणी राज्यभरातील मनसैनिकांना जमा होण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. शेगावमध्ये राहुल गांधींच्या भाषणादरम्यान काळे झेंडे दाखवा, असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माहिती दिली आहे.
संदीप देशपांडे म्हणाले, राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी आम्ही शेगावला जाणार आहोत. शेगावला जाऊन त्यांच्या यात्रेत जाऊन आम्ही त्यांचा निषेध करणार आहोत. उद्धव ठाकरे हे स्वतःला वाघ म्हणवतात मग आता का गप्प बसले आहेत. शिवसेनेला सत्तेची लालसा आहे म्हणून ते अशी भूमिका घेत आहेत, अशी टीकाही त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.
दरम्यान, याआधीही संदीप देशपांडेंनी ट्विटरद्वारे राहुल गांधी आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा अपमान आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या बाजार बुणग्यांना भर चौकात चाबकाचे फटके दिले पाहीजेत, अशा शब्दांत देशपांडेंनी टीका केली होती. तर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना काही लोक मिठ्या मारतात या नेत्यांच करायच काय खाली डोक वर पाय, असे त्यांनी म्हंटले आहे.