खैरेंच्या सत्कारामुळे शिंदे गटाचे आमदार शिरसाट प्रचंड चिडले अन्...
सचिन बडे | औरंगाबाद : पोलीस आयुक्तालय औरंगाबाद यांच्यावतीने गणोशोत्सवाच्या अगोदर समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राजकीय नेत्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कार करण्यात आला. परंतु, यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आणि मंत्री पदासाठी उत्सुक असलेले आमदार संजय शिरसाट कमालीचे चिडलेले पाहायला मिळाले.
समन्वय बैठकीत चंद्रकांत खैरे यांचा वयाचा मान राखून त्यांचा पहिला सत्कार करण्यात आला. परंतु, संजय शिरसाट नाराज झाले आणि माझ्या अगोदर चंद्रकांत खैरे यांचा सत्कार प्रोटोकॉल नुसार चुकीचा आहे, असे म्हणत खुर्चीवरून उठत कार्यक्रम सोडून निघून चालले होते. त्यावेळी एम.आय.एम. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील शिरसाट यांच्या बाजूलाच बसले होते. जलील यांनी शिरसाट यांचा हात धरून त्यांना थांबवले. त्यानंतर शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात असा गदारोळ झाल्याने महाराष्ट्रभर संजय शिरसाट यांच्यावर टीका होत आहे.आमदार पदावरील व्यक्तीने अशा प्रकारे वर्तणूक करणे योग्य आहे का? असे सोशल मीडियावर बोलले जात आहे.
दरम्यान, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याचे दिसत होते. अशातच संजय शिरसाटांनी ट्विटवर उध्दव ठाकरेंचा व्हिडीओ शेअर केला होता. यामुळे शिरसाट परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, संजय शिरसाट यांनी या चर्चा फेटाळल्या. परंतु, शिरसाटांची नाराजी अद्याप दूर झाले नसल्याचे दिसत आहे.