कितीही गुन्हे दाखल करा, मी भीक घालत नाही; राणांचे नाव न घेता बच्चू कडूंना आव्हान
राज्यात एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद सुरु असताना आता भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांच्यातील वाद शिंगेला आहे. बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर हा वाद आता टीकेपुरता मर्यादित राहिला नसून हा वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत गेला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर आता रवी राणा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रवी राणा?
आमदार रवी राणा यांची आमदार बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. माझा कुणाशीही वाद सुरू नाही. माझ्यावर टीका केली जाते. त्याचा हिशोब जनता करेल. माझ्यासाठी उपोषण करण्यापेक्षा दिव्यांगासाठी उपोषण करा. कितीही गुन्हे दाखल करा, मी भीक घालत नाही, असे आव्हान रवी राणा यांनी बच्चू कडू यांना नाव न घेता दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आमचेच आहेत. त्यांचा जो आदेश आहे तो माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी त्यांच्या आदेशाचे पालन करतो. मी जे बोललो ते सत्य आहेच. खालच्या थराची भाषा वापरणे ही महाराष्ट्रची संस्कृती नाही. स्वतःला सत्यवादी समजणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. खोट पण रेटून बोलण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीका रवी राणा यांनी यावेळी केली.