बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद शिंगेला, राणांविरुध्द पोलिसात तक्रार
राज्यात एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद सुरु असताना अमरावतीमधील युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा आणि शिंदे गट आमदार प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांच्यातील वाद उफाळत चालला आहे. बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले. हा वाद आता टीकेपुरता मर्यादित राहिला नसून हा वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत गेला आहे. बदनामी केली असल्याचा आरोप करत रवी राणांविरोधात बच्चू कडू यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
आमदार रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्षे आम्ही राजकीय करिअर उभं करायला गेलं आहेत. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी दिले असतील. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, रवी राणा यांनी जे काही आरोप केले आहेत त्याचे पुरावे द्यावे. विषय छोटा नाही. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून सांगता. दुसरीकडे स्वतः मंत्रिपदाच्या रांगेत उभे राहता आता आरपारची लढाई लढायला मी तयार आहे. असे विधान यावेळी बच्चू कडू यांनी केले. जिथे म्हणाल तिथे एकटा यायला तयार आहे, असे खुल आव्हान बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिले आहे.
काय म्हणाले होते रवी राणा?
काल अमरावतीत बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा व नवनीत राणा या दाम्पत्यावर किराणा वाटपावरून टीका केली होती. याला आज आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, बच्चू कडू हे फर्स्ट्रेशनमध्ये गेले आहेत. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला धोका दिला. गुवाहाटीमध्ये जाऊन त्यांनी कोटींचा व्यवहार केला, असा खळबळजनक आरोप रवी राणा यांनी केला होता.