शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी? बच्चू कडूंचे मोठे विधान
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच या बंडखोरीमुळे शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केले. हे सरकार स्थापन होऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. या शिंदे- फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र, तरीही या सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार अद्याप झाला नाही. याबाबत आता शिंदे गट समर्थक आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.
दिव्यांग मंत्रालयाचं मत्रीपद तुमच्याकडे कधी येणार आहे? असा प्रश्न विचारला असता त्यावर बोलताना ते म्हणाले की, मला वाटतं, हा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विचारायला हवा. आम्ही सर्व आमदार जेव्हा एकत्र बसत असतो. तेव्हा मी त्यांना सांगत असतो की, 2024 नंतरच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. असे ते यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, एवढ्यात मंत्रीमंडळ विस्तार झाला तर आम्ही तुम्हाला पेढे भरवू. पण आम्ही सगळ्या आमदारांनी आता आमची मानसिकता तयार करून ठेवली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात तुम्ही डोकं नका लावू, काहीतरी काम करा. असे विधान त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले.