बावनकुळेंचे 'त्या' विधानावरून मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला; म्हणाले, जागे व्हा...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज नवनवीन विषयावरून जुंपलेली दिसत आहे. तर दुसरीकडे पाठोपाठ वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. हा सर्व गोंधळ सुरु असताना त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजे असे विधान केले होते, त्यावरूनच आता राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे.
काय म्हणालेत अमोल मिटकरी?
बावनकुळे यांच्या विधानावर बोलताना अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, दस्तुर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे, अर्थ साधा सोपा तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही !जागे व्हा !! असा सल्ला मिटकरी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे.
काय म्हणाले होते बावनकुळे?
नागपुरात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारक आणि आर्ट गॅलरीचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलत असताना बावनकुळे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या बाहेर निघालेले नेते आहेत. न्यायासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदत केली आहे. जो जो समाज त्यांच्याकडे गेला. त्याच्यासाठी त्यांनी काम केलं आहे. मराठा असतील, धनगर असतील, ओबीसी असतील, सर्वांसाठी त्यांनी काम केलं. माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते मुख्यमंत्री झाले पाहिजे असे बावनकुळे यावेळी म्हणाले.