मिटकरींच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटीलांचे सूचक विधान; म्हणाले, भविष्यात कोणतेही गट...
राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. तर दुसरीकडे अनेक राजकीय मंडळींकडून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार अशी तर्क - वितर्क लावण्यात येत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्थिर आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पवार यांची भेट घेतली. या भेटीवर राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी म्हणाले होते की, भविष्यात वेगळं काही निर्माण होईल असे विधान केले होते. त्यावरच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केले आहे.
गुलाबराव पाटील मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानावर उत्तर दिले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीत राजकारण असू शकत नाही. सुख दुःखात एकमेकांकडे जाणे हे राजकारणाच्या पलिकडचे विषय असतात. मात्र भविष्यात कोणतेही गट एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरै यांनी काँग्रेसचे 22 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक विधान केले होते. तर राज्यातील अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहे. तुम्ही त्या नावांची कल्पनाही करणार नाही, असे विधान भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन केले होते. या चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे भाकीत केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.