मंत्री देसाईंचे शरद पवार यांना प्रत्युत्तर; म्हणाले, लहान मुलगाही....
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. नुकताच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील या सीमावादारून खडाजंगी झालेली पाहायला मिळाला. हा वाद शांत करण्यासाठी शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यावरच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली होती. त्यालाच आता मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले देसाई?
शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देताना देसाई म्हणाले की, “होय, मी त्यांच्यापेक्षा वयाने लहानच आहे. शरद पवार वयाने खूप मोठे आहेत. माझ्या वडिलांपेक्षा त्यांचं वय अधिक आहे. त्यामुळे त्यांना आम्ही लहानच वाटणार, पण ठीक आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. मी त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही.
पवारांच्या आशीर्वादाने मला कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा समन्वयक मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी ही संधी दिली. त्यामुळे आम्ही कामातून शरद पवारांना दाखवून देऊ की, लहान मुलगाही किती चांगलं काम करतो, हे मी शरद पवारांना नम्रतापूर्वक सांगत आहे,” अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.