महाविकास आघाडीने उमेदवार केले घोषित, नाशिकमधून शुभांगी पाटीलच; पाहा कुठे कोण?
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीवरुन राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यातच महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबतही चर्चा सुरु होती. यावर आज महाविकास आघाडीने अधिकृत घोषणा केली आहे.
नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे आणि कोकणातून बाळाराम पाटील हे अधिकृत उमेदवार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले आहे. तर, बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहिर केला आहे. सोबतच सत्यजित तांबे यांना निलंबित करणार असल्याचेही कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.
बेरोजगारी मोठ्या प्रमाणात झाली आहे. जुनी पेन्शन काँग्रेसने तीन राज्यात लागू केली आहे. जनतेमध्ये भाजपविरोधात राग आहे. नाशिकमध्ये भाजपकडे उमेदवार नाही. या पाचही जागा मविआ जिंकणार असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात नक्की येणार आहेत. ते सध्या रुग्णालयात आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा निर्णय नाही. आम्ही आज महाविकास आघाडी म्हणून घोषणा करतोय. राष्ट्रवादी मविआमध्ये आहे, असे त्यांनी सांगितले आहे.