Maharashtra Politics : शिंदे भाजप सरकारची होणार आज खरी परीक्षा; सिद्ध करावं लागणार बहुमत
महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवस सुरू असलेल्या बंडखोरीनंतर मोठे बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज सकाळी 11 वाजता फ्लोर टेस्ट होणार आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये जिंकून सरकारने पहिला विजय मिळवला. तर आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार असून मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे आणि आज शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करायचं आहे. विधानसभेच्या फ्लोअर टेस्टपूर्वी (Floor Test) रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे सर्व आमदारही सहभागी होते.
शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांची निवड कायम ठेवण्यात आली आहे. तसेच त्यांना आज होणाऱ्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली असून एकनाथ शिंदे यांनी पहिली लढाई जिंकली आहे.
भाजप शिंदे यांच्याकडून आज होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी आपापल्या आमदारांना मार्गदर्शन केले आहे. आज होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी रणनीती आखण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिक माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्वीटर आकांऊटवरून दिली आहे. शिवसेना आणि भाजप सरकारकडे बहुमत असले तरी जेव्हा प्रत्यक्ष मतदान सुरू होईल तेव्हा काय होईल हे सांगता येत नाही. यासाठी पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेना आमदारांनी व्हीप न पाळल्यामुळे विधानसभा अध्यक्षांना 39 आमदारांच्या निलंबनासाठीही मागणी केली जात आहे.