महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार; आंबेडकरांनंतर राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा
बीड : राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चां रंगल्या होत्या. या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला असून राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. अशातच, राज्यात दोन राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यानेही आंबेडकरांच्या दाव्याला दुजोरा देत महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचा दवा केला आहे.
बीडच्या माजलगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जाहीरपणे भूमिका मांडली आहे. पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला काही ना काही चमत्कार करावा लागणार आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं, असा दावा प्रकाश सोळंके यांनी केला आहे. महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असून सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे. ते नक्की होणारच त्याबद्दल कोणीही शंका आणू नये, असेही त्यांनी म्हंटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
राज्यात २ भूकंप होणार आहे. एक भूकंप होता होता थांबला. राज्यात २ भूकंप होतील त्यावर मी कायम आहे. सगळेच सांगितले तर उत्सुकता जाते. त्यामुळे मी सांगत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.