महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा तिढा उद्या सुटणार? शिंदे गटाच्या याचिकेची सुप्रीम कोर्टाने घेतली दखल
मुंबई : शिवसेनेवर शिंदे गटाने दावा केल्यानंतर आता निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरुही केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती दिली होती. याप्रकरणी शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव घेत लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत उद्याच घटनापीठाची स्थापना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. परंतु, सर्वोच्च न्यायलयाने सुनावणीला स्थगिती दिल्याने शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यास 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु, त्याआधीच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला तातडीने ग्रीन सिग्नल द्यावा, यासाठी कोर्टाकडे विनंती केली होती. आज शिंदे गटाच्या वतीने वकील सर्वोच्च न्यायालयात मेन्शनिंग रिट याचिका केली आहे. या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत उद्याच घटनापीठाची स्थापना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे उद्या घटनापीठ सदस्यांची नावे समोर येणार असून लवकरच महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.