महाविकास आघाडी सरकार कोसळणार? शिंदे गटाच्या याचिकेत आमदारांनी पाठिंबा काढल्याचा दावा
मुंबई : शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यामुळे महाविकास आघाडी विरुध्द शिंदे गट अशी लढत न्यायालयात होणार आहे. यावेळी न्यायालयाच्या निकालावर शिंदे गटाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अशातच राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेत 38 शिवसेना आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा केला आहे.
शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेत 38 शिवसेना आमदारांनी व अपक्ष आमदार असे 51 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, या याचिकेत बंडखोर नेत्यांच्या जीवाला धोका असल्याचेही याचिकेत सांगण्यात आले आहे. यासाठी संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओच्या लिंक सोबत देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उपसभापतींनी 16 आमदारांना बजावलेल्या नोटीसला शिंदे गटांनी आव्हान दिले आहे. अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी होणार असून न्यायालयात शिंदे गटाची बाजू ज्येष्ठ वकील हरीश साळवे मांडणार आहे. तर, महाविकास आघाडीची बाजू कपिल सिब्बल व रवि शंकर जांध्याल आणि मनू सिंघवी हेही मांडणार आहेत. यामुळे या सुनावणीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.