कोकणातील विजयासाठी महाविकास आघाडीतून छुप्या मदती; गुलाबराव पाटलांचा मोठा दावा
मुंबई : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून कोकणात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कोकणात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना मोठा दावा केला आहे.
सत्तातंरानंतर कोकणात भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. कोकणात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मोठ्या आघाडीने मविआच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत बाळाराम म्हात्रे यांना 20800 मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 9500 मते मिळाली. बाळाराम म्हात्रे यांच्या विजयाने भाजप-शिंदे यांच्या गटात आनंदाचे वातावरण आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून पदवीधर निवडणुकीतून लोकांचा कौल समोर आहे.
तसेच, महाविकास आघाडीतून झालेल्या छुप्या मदती पुढेही होतं राहतील, असे म्हंटले आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीतून झालेल्या त्या छुप्या मदती कोणाच्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
दरम्यान, गाव तिथे शाखा, शाखा तिथे शिवसैनिक ही संकल्पना सुरू करणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, मुख्यमंत्र्यांचा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ग्रामीण भागात ५०० दवाखाने सुरू केले जाणार आहे. यासोबतच, मंत्र्यांना जनता दरबार घेण्याच्या सूचना केल्या असून दर आठवड्यात मंत्र्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्र्यांनी बाळासाहेब भवन येथे बसावे, अशीही माहिती गुलाबराव पाटील यांनी सांगितली आहे.