महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचे अजब विधान; म्हणाले,केंद्र काय करणार?
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफळला आहे. काल मंगळवारी वाद तीव्र झाला होता. महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी या हल्ल्याचा निषेध करत राज्यातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. त्यावरूनच आज झालेल्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात देखील या वादावरून गदारोळ उडाला. मात्र, यावेळी खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या मागणीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अजब विधान केलं.
काय म्हणाले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला?
सुप्रिया सुळे यांच्या मागणीवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भूमिका मांडली. “तुमच्या कुणाचंही वक्तव्याची नोंद होत नाहीय. कोणत्याच रेकॉर्डमध्ये तुमचं विधान जाणार नाही. हा संवेदनशील विषय आहे. विषय दोन राज्यांचा आहे. त्यामध्ये केंद्र काय करणार? दोन राज्यांमध्ये केंद्र काय करणार, हे संसद आहे”, असे अजब मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मांडले.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
महाराष्ट्र् कर्नाटक सीमावादावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांत एक नवा प्रश्न उभा राहिलाय. आमच्या शेजारच्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री काहीही अभद्र बोलत आहेत. विशेष म्हणजे काल त्यांनी हद्दच पार केली’, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
कर्नाटकाच्या सीमेवर महाराष्ट्राचे नागरीक जात होते. पण त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र सुरुय. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहेत. दोन्ही राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. तरीही कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विरोधात बोलत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला मारहाण करण्यात आलीय. हे चालणार नाही. मी गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करते की, त्यांनी या प्रकरणात लक्ष द्यावं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मुजोरी चालणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.