कोश्यारींना वादग्रस्त विधान भोवणार? राज्यपालपद जाणार?
नुकताच काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादेत बोलत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून राज्यपालांचा जोरदार विरोध होत होता. त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेमध्ये राज्यपालांवर राज्यातील शांतता आणि एकोपा बिघडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राज्यपाल कोश्यारींनी वारंवार महापुरुषांचा अपमान केला असून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचं याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान, या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असून याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडीनंतर राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य भोवण्याची चिन्हं आहेत.
राज्यपाल दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर?
वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पहिल्यांदा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उत्तर भारतात नियोजित कार्यक्रम आहेत. त्यामुळे ते दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.