किशोरी पेडणेकर एकनाथ शिंदे गटात जाणार; रवी राणा यांचा दावा
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक पदाधिकारी, शिवसैनिक उध्दव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील होत आहे. अशात शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. परंतु, त्यांनी चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मात्र, आता यावर अपक्ष आमदार रवी राणा यांनी सूचक भाष्य केले आहे.
रवी राणा म्हणाले की, खरी बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेंसोबत आहे. उद्धव ठाकरे गटाचे 80 टक्के नगरसेवक एकनाथ शिंदे सोबत जाणार आहे. किशोरी पेडणेकर सुद्धा एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तर, शिंदे गटाकडून मुंबई महानपालिकेतील शिवसेना कार्यालयावर कब्जा केला आहे. यामुळे पालिका मुख्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरही रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे सोबत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. प्रशासनाने कुलुप लावले ते योग्य आहे. उद्धव ठाकरेंचे काही शिवसैनिक त्या ठिकाणी टक्केवारी वसूल करतात. ही टक्केवारी मोडून काढली पाहिजे. शिवसेना भवनचा ताबाही एकनाथ शिंदेनी घेतला पाहिजे, असे रवी राणांनी म्हंटले आहे.
दरम्यान, एसआरए घोटाळ्यातील आरोपीशी झालेल्या व्हॉट्सपवरील संभाषणामुळे किशोरी पेडणेकर अडचणीत आल्या आहेत. दादर पोलिसांनी जून महिन्यात दाखल झालेल्या एसआरए प्रकल्पाशी संबंधित एका गुन्ह्यात पेडणेकर यांची चौकशी सुरू केली आहे.