त्यांची मन जुळू दे किंवा शरीर जुळू दे, आमची मात्र...; पेडणेकरांची महायुतीवर टीका
मुंबई : दिपोत्सवानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले होते. यावरुन राज्यात मनसे, भाजप-शिंदे गट महायुतीत दिसणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. अशातच मनसे आमदार राजू पाटील यांनीही संकेत दिले होते. यावरुन शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री मुळचे शिवसैनिक आहेत. पण, अगोदरचे शिंदे साहेब व आताचे त्यांचे वर्तन यात जमीन आस्मानचा फरक दिसतोय. ते कुणाची स्क्रिप्ट चालवत आहेत ते दिसतंय. ते स्वत:चे वाक्य बोलत नसल्याचे दिसून येते. जुन्या कडीला उत आणून वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना काय हवंय तेच ते बोलतात. लवंगी अँटमबॉम्बचे ते पॅकेज आहे, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
तर, मनसे आमदार राजू पाटील यांनी आमची मनं जुळली आहेत. वरून तारा जुळल्या की सगळे जुळून येईल, असे सूचक विधान केले होते. यावर त्यांचे मन जुळू दे किंवा शरीर जुळू दे. आमची मात्र लोकांशी नाळ जोडलीय. घर फिरले की वासेही फिरतात, असा निशाणा पेडणेकरांनी साधला आहे.
दरम्यान, भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे गट समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद उफाळत चालला आहे. गुवाहाटीमध्ये जाऊन त्यांनी कोटींचा व्यवहार केला, असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडूंवर केला होता. याविरोधात बच्चू कडू यांनी राणांविरोधात थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यामुळे अखेर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मध्यस्थी करावी लागली असून दिवाळीनंतर बैठक घेणार आहेत. यावर टीका करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, खोका शब्द डाचत असेल तर मग पेट्या असतील. रवी राणा आणि नवनीत राणांचे अस्तित्व हे फक्त भो भो करण्यापुरते, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.