किरीट सोमयांच्या मुलाला 14 महिन्यातच पीएचडीची पदवी बहाल
मुंबई : आर्थिक घोटाळे खणून काढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. किरीट सोमया यांच्या मुलाला केवळ 14 महिन्यातच पीएचडीची पदवी बहाल करण्यात आली आहे. यामुळे यावर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी देण्यात आली. यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. परंतु, पीएच.डीच्या प्रमाणपत्रावरील तारखेनुसार विद्यापीठाने नील यांना १४ महिन्यांत पदवी दिल्याने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रमाणपत्रावर त्यांनी १ जानेवारी २०२१ रोजी नोंदणी केली होती आणि त्यानंतर १७ ऑगस्ट २०२२ रोजी पूर्ण झाली आहे.
विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार ही पदवी खूप कमी वेळात देण्यात आल्याची तक्रार कुलगुरूंकडे दाखल करण्यात आली आहे. परंतु, नील सोमय्या यांना विद्यापीठ नियमानुसारच पीएच.डी.ची पदवी प्रदान करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण त्यांचे मार्गदर्शक व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी दिले.
दरम्यान, किरीट सोमय्या हे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. चार्टर्ड अकाउंटटच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत त्यांनी स्थान मिळवलं होतं. पुढे 2005 साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून फायनान्समध्ये डॉक्टरेटही मिळवली. परंतु, त्यांच्या मुलाला इतक्या कमी वेळेते ही पदवी मिळाल्याने सोशल मीडियावर आता चर्चा रंगत आहे.