डॉ. अमोल कोल्हेंनी लावला लोकशाहीला फोन; म्हणाले...
छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल १० वर्षांनंतर हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कलाकारांसह राजकीय नेतेही हजेरी लावणार आहेत.
राष्ट्रवादीचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या आगामी भागात हजेरी लावणार आहेत. त्या भागाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अवधूत गुप्तेने कोल्हे यांना एक फोन करायला सांगितलं. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लोकशाहीला फोन लावला.
अमोल कोल्हे म्हणाले की, “लोकशाहीच ना? नाही, आवाज थोडा खाली गेल्यासारखा जाणवला म्हणून विचारलं. कारण कसंय तू असण्यात, तू टिकण्यात १४० कोटी भारतीयांचं भवितव्य अवलंबून आहे. काही प्रश्न मनात होते म्हणून म्हटलं फोन करावा. प्रश्न पडले तरी ते विचारण्याचा अधिकार घटनेने दिला आहे, पण ते विचारण्याची आता मुभा नाही, मोकळीक नाही. कारण प्रश्न विचारले की ट्रोलधाड येते आणि देशद्रोह्याचा शिक्का मारून जाते आमच्या मस्तकावर. सियाचिनला मायनस २० डिग्री सेल्सियसमध्ये देशांच्या सीमांचं रक्षण मुलगा करत असतो आणि त्याचा ७५ वर्षांचा बाप दिल्लीत कडाक्याच्या थंडीमध्ये त्याच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करत असतो. त्या आंदोलकांपैकी काहींना मगरूर सत्ताधाऱ्यांच्या गाडीखाली निष्ठुरपणे चिरडलं जातं, तेव्हा प्रश्न निर्माण होतो की कुठल्या तोंडाने म्हणायचं जय जवान, जय किसान?” असं अमोल कोल्हे म्हणाले.