आनंद दिघेंबाबत केलेल्या शिरसाटांच्या दाव्यावर केदार दिघेंचे भाष्य; म्हणाले, चुकीची घटना घडली असेल तर...
राज्यात मागील काही महिन्यांपासून शिवसेनेतील झालेल्या बंडखोरीमुळे प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. हाच वाद सुरू असताना दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत पुन्हा एकदा संशय निर्माण करण्यात आला आहे. 'आनंद दिघेंचा अपघात नव्हे खून झाल्याचा संशय आहे', असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले होते. यावरून आता वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिरसाटांच्या याच दाव्यावर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले केदार दिघे?
पत्रकार परिषदेत बोलताना केदार दिघे म्हणाले की, मला अत्यंत दुःखं वाटतं की दिघे साहेबांच्या पश्चात गेल्या 22 वर्षांत त्यांच्या मृत्यूचा विषय कधी कोणी काढला नाही. कधीही कोणी याबाबतीत बोलले नाही. अचानक निवडणुका येतात किंवा स्वतःचे अस्तित्व दाखवायचे असते तेव्हा दिघे साहेबांचा विषय काढला जातो. आता शिरसाटही असे म्हणाले की, आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत चौकशी व्हावी. माझी थेट मागणी आहे की, तुमच्याकडे काही असेल तर, गुरुवर्य आनंद दिघे यांना मी अग्नी दिला आहे. मी त्यांचा पुतण्या आहे. त्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की दिघेसाहेबांच्या बाबतीत कोणतीही चुकीची घटना घडली असेल तर त्यासाठी मी ठामपणे आणि खंबीरपणे उभा राहायला तयार आहे. परंतु, बोलायचं म्हणून बोलायचं आणि दिघे साहेबांच्या नावाने स्वतःला टीआरपी मिळवून घ्यायचा, हा केविलवाणा प्रकार त्यांच्याकडून दिसतो. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले की, 'गेली 22 वर्षे पाहिलं तर यांचे फोटो मोठे झाले. दिघे साहेबांचा फोटो त्यांच्या फोटोमागे जायला लागला. काही ठिकाणी फोटो लागलेच नाहीत. हे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे. दिघेसाहेबांच्या नावाने लोकांच्या कल्याणाचे कार्यक्रम होणार असतील तर चांगले आहे, पण त्यांच्या नावाने राजकारण होणार असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या १० महिन्यांत शिवसेनेचं नाव तुम्ही चोरलंत, पक्ष तुम्ही चोरलात, चिन्ह तुम्ही चोरलंत, आणि त्यावरून दिघेसाहेबांची तत्व शिकवत आहात? दिघेसाहेब भगव्याशी एकनिष्ठ होते. दिघेसाहेबांच्या पश्चात अनेक पदे उपभोगली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाल पदे उपभोगली. तर गेल्या सहा आठ महिन्यांत असं काय घडले की ते पक्षावर दावा करत आहात. असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला.