धनंजय मुंडेंना सोडणार नाही, मी बीडमध्ये घर घेतले आहे; करुणा शर्मांचा घणाघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यामध्ये मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद सुरु आहे. अनेक वादग्रस्त घडामोडी घडल्यानंतर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आव्हान दिले आहे. मी बीडमध्ये घर घेतले असून, धनंजय मुंडे यांना सोडणार नसल्याचे विधान करुणा शर्मा यांनी केले आहे.
बीडमध्ये माध्यमांशी बोलतांना करुणा शर्मा म्हणाल्या की, खोट्या केसमध्ये अडकवून मला वर्षभरापूर्वी बीडमध्ये कारागृहात टाकण्यात आले होते. सत्तेचा दुरुपयोग करून त्यावेळी मला जेलमध्ये टाकण्यात आले होते. त्याचवेळी मी ठरवलं होतं की, घाणीत उतरुनच मी ही घाण साफ करणार. बीडमध्ये येऊन त्या विरोधात लढा देण्यासाठी मी आज बीडमध्ये घर खरेदी केले आहे. धनंजय मुंडे यांना मी सोडणार नाही. धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्याची मी संपूर्ण तयारी केली आहे, त्यांनीही माझ्याशी लढण्याची तयारी करावी. त्यासाठीच आज मी बीडमध्ये आले आणि घर खरेदी केले आहे. असे वक्तव्य त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले.
पुढे त्या म्हणाल्या की, बीडचे नागरिक आज माझ्यासोबत आहेत. बीडच्या जनतेवर माझा एवढा विश्वास आहे की, येथील जनतेने कायम न्याय केला आहे. धनंजय मुंडे असो की करुणा मुंडे. बीडच्या जनतेने नेहमी न्याय केला आहे. आज मी एकटी नाही. धनंजय मुंडे यांनी अनेक कार्यकर्त्यांना खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकले आहे, हे बीडच्या जनतेला माहिती आहे. शिवराज बांगर, बबन गीते यांना धनंजय मुंडेंनी जेलमध्ये टाकले. बबन गीते यांना अडकविण्याचा संपूर्ण प्लॅन माझ्या समोरच केला होता, असा गंभीर आरोप देखील यावेळी बोलताना करुणा शर्मा यांनी मुंडेंवर केला.