सीमाभागातील गावांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; जतमधील गावांसाठी 2 हजार कोटींचा निधी
मुंबई : जतच्या सीमावर्ती भागातील 40 गावावर दावा करणाऱ्या कर्नाटकने बुधवारी तुबची योजनेचे पाणी जत पूर्व भागात सोडले आहे. यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात ओवरफ्लो झाला. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. जत तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी 2 हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, कर्नाटकने महाराष्ट्राला डिवचत जत तालुक्यात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी जतमधील लोकांसोबत भेट झाली. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जानेवारीमध्ये 2 कोटींचे टेंडर काढत आहोत. सेवा, सुविधा मिळाली नाही म्हणून गावे बाहेर जाणार नाही ही राज्याची जबाबदारी आहे.
त्या भागात कसे उद्योग निर्मिती करता येईल याबत धोरण आखले जात आहे. अशा गावांचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. आमचा वैयक्तिक अजेंडा नाही. लोकांना चांगले दिवस आले पाहिजे. मी त्या सरकारमध्ये होतो. त्यात त्रुटी होत्या. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर चांगले निर्णय घेतले. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत जल सिंचन विभागाच एकतरी निर्णय घेतो. कारण बळीराजा आपला मायबाप आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि माजी जलसंपदा मंत्री एम.बी. पाटील यांनी जतच्या 40 गावांवर दावा करून महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर जत तालुक्यात प्रचंड संताप व्यक्त होतानाच पूर्व भागाला पाण्यापासून वंचित ठेवल्याने राज्य सरकारवर देखील नाराजी व्यक्त होत आहे. राज्य सरकार एकीकडे म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेत आहे. तर याचवेळी कर्नाटकने जतच्या लोकभावनेला हात घालत थेट तुबची योजना सुरू करून जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.