कर्नाटक मुख्यमंत्र्याचे विधान हास्यास्पद; शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा भागावरील बेळगावचा प्रश्न सोडवण्यासाठी नुकतेच राज्य सरकारच्या वतीने चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांची नियुक्ती करण्यात आली होती. अशातच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करणार असल्याचं सांगितलं. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या टीकेला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्याचे विधान हे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
शंभूराज देसाई म्हणाले की, कर्नाटक मुख्यमंत्र्याचे विधान हे हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस यांनी या समितीचे पुर्नगठन केले आहे. सर्वपक्षीय ही बैठक होती. यात दोन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. यासाठी वकिलांचीही नियुक्ती केली. मराठी ८५० गावे आहेत ही महाष्ट्रात घेण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना विविध सुविधा दिल्या आहेत. यामुळे आता कर्नाटक सरकारकडे काहीच उरले नसल्याने ते हा केवीलवाणा प्रयत्न करत आहेत.
न्यायाची बाजू व्यवस्थित मांडण्यासंदर्भात शिंदे व फडणवीसांच्या सक्त सूचना आहेत. कर्नाटक त्या भागाला काय पाणी पुरवणार. कर्नाटकलाच आता कोयनेचं पाणी जातं. त्यांना पाणी कमी पडलं की ते आम्हाला विनंती करतात, असेही त्यांनी म्हंटले आहे.
आम्हाला कर्नाटकमध्ये जायचं आहे त्यातील एका गावानेही तसं सांगितलेलं नाही. ज्याचा दाखला कर्नाटक प्रशासन देत आहेत की ४० गावं कर्नाटकमध्ये राहण्यास इच्छुक असल्याची ती मागणी दहा वर्षापूर्वीचं आहे. पण, तसा कुठलाही कागद राज्य सरकारला दिलेला नाही. शिंदे-फडणवीस सरकारवर लोकांचा विश्वास आहे. कर्नाटक सरकार सीमेवरील गावात अत्याचार करत असताना तिकडे कोण जाईल. तसेच, या भागात १२०० कोटीची योजनाही सुरू केली आहे. म्हैसाळचा विस्तारीत टप्पा तो असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी मुख्यमंत्री ४० दिवस जेलमध्ये राहिलेले आहे. त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य चांगलं माहित आहे. शिंदे सरकारच्या काळात मागील ५ महिन्यात तरी सीमेवरील गावातून कुणाचं पत्र आलेलं नाही. आम्ही पंतप्रधान मोदीची भेट घेणारच आहोत. मात्र या सीमा भागांना लवकरच भेट देऊ. लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची चर्चा करू. चंद्रकांत पाटीलसोबत असतीलच, असेही देसाईंनी सांगितले.
शंभूराज देसाईंनी यावेळी संजय राऊतांवरही टीका केली आहे. केवळ भडक वक्तव्य करण हेच राऊत करतात. राऊत या प्रश्नांसाठी किती वेळा जेलमध्ये होते. राऊत जेलमध्ये असताना शांतता होती. आता पुन्हा सकाळ-सकाळी त्यांचे दर्शन घडायला लागलं, असा निशाणा त्यांनी साधला आहे.