महाराष्ट्र अनाथ झालायं; बारसू रिफायनरीवरुन आव्हाडांची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका
मुंबई : कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन तापले असून आंदोलक-पोलिस आज आमने-सामने आले. यादरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र अनाथ झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. तर, सरकारकडून खोटी माहिती दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
सरकार कडून खोटी माहिती दिली जाते. रिफायनरी संघटना पंचकृषितील सर्व गावांनी १५ पत्र सरकारला लिहिली आहेत. रेड कॅटेगरीतील असल्यामुळे हा प्रकल्प रद्द व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. लोक आमच्या बाजूने आहेत, असं सांगितलं जात आहे. लोक बाहेरून आली आहे, असे म्हंटले जात आहे. परंतु, मला ही सगळी लोक भेटली असून ती बारसू सोळगाव हे कोकणातील गाव आहे. ही सगळी गाव कोकण किनारपट्टीवरील आहेत.
साधारण इथली माणस मुंबईत असतात. कोकणातील प्रत्येक माणूस हा सुट्टीला गणपतीला, होळीला गावी जातोच. त्याच्या गावाशी नाळ एकदम घट्ट असते. पूर्ण मुंबईतील लोक सुट्ट्या टाकून त्या भागात गेली आहेत. कृपया महाराष्ट्राला खोटी माहिती देऊ नका, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
ज्या गावांवर परिणाम होणार आहे त्या सर्वांनी ठराव केला आहे. त्याला ९० टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांना तिथली माहिती दिली जात नसेल तर ते काय करणार बिचारे? आपल्या समोर पोलिसांचा अश्रुधुर फेकतानाचा व्हिडिओ आहे. एक न फुटलेल्या नळकांडीचाही फोटो तेथील एका माणसाने पाठवला आहे. बायकांना खेचून घेऊन जातानाचे क्लिप आहेत. अजून काय अन्याय असतो? आंदोलन चिरडणे म्हणजे काय असत? पोलिसांकडून गोळ्या घालून ठार मारणं एवढाच आहे का? सरकार इतकं निर्दयी आहे की ते करायला पण कमी करणार नाही, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
आपल्या महत्वाकांक्षेसाठी १४ जणांचे बळी घेतले. ही महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आडवे पडले. सरकारला स्थानिक गरीब मराठी माणसाबद्दल प्रेमच नाही. अवकाळी पावसाचे अजून पैसेच मिळाले नाहीत. शेतकरी उध्वस्त झाला आहे. महाराष्ट्र अनाथ झाला आहे, अशा शब्दांत आव्हाडांनी शिंदे-फडणवीसांवर टीका केली आहे.