त्या गरीबांना फासावर...; आव्हाडांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही दिवसांपुर्वी दोन गुन्ह्यात अटक व जामीन सत्र झाले होते. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण अस्थिर झाले होते. विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांच्या फैरी झाल्या होत्या. हे शांत होत असतानाच आता पुन्हा आव्हाडांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश कोण देते ठाण्यात हे महाराष्ट्राला माहित आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात 72 तासांत दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलीस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात. म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हात वर करून मोकळे होऊन जातील. ह्याच्यात काय करावे हे सुचत नाहीये. आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवा, कि ह्या वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी अर्थात त्यांचा काय दोष? आदेश कुठून आले हे महाराष्ट्र ला माहित आहे, असा निशाणा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली होती. यात त्यांना जामीन न्यायालयाने मंजूर केला होता. तर, भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला होता. यातही आव्हाडांना जामीन मिळाला आहे.