छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड सहन करणार नाही : जयंत पाटील
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित तथ्यांची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा असलेला पक्ष आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड कदापि सहन केली जाऊ शकत नाही.
चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित पुरावे उपलब्ध असलेली तथ्ये जशीच्या तशी दाखवावीत, कुठेही इतिहासाशी छेडछाड करू, नये असेही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे बजावले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनीही रविवारी पत्रकार परिषदेत संबंधित निर्माते आणि दिग्दर्शकांना सज्जड दम दिला आहे. नव्याने प्रदर्शित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांत इतिहासाची मोडतोड करण्यात येत आहे. ज्या घराण्याचे आपण नाव सांगतो, जे नाव आणि कर्तृत्व ही आपली अस्मिता आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे विपर्यस्त चित्रण दाखवले तर सहन करणार नाही. चुकीचा इतिहास चित्रित केलात, तर याद राखा, माझ्याशी गाठ आहे, असा इशारा त्यांनी भरला.