मुंबई : अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जयंत पाटील म्हणाले की, भाजपला जशी काही मते कमी पडतात. तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात. परंतु, आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो आहे. त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याची माहिती त्यांनी दिली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल. तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही. त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील. त्यावेळी चित्र स्पष्ट होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. यानुसार भाजपने पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना रविवारी उमेदवारी घोषित केली. यासोबतच शिवसेनेची कोंडी करण्यासाठी धनंजय महाडीक यांच्या रुपाने तिसरा उमेदवारही भाजपने निवडणुकीत उभा केला आहे. तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे शिवसेना व भाजपची थेट लढत रंगणार यात शंका नाही.