सरकारने डोकं ठिकाणावर ठेवलं पाहिजे; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र
अमोल धर्माधिकारी | पुणे : सत्तातंरानंतर शिवसेना (ठाकरे गट) शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सामना अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येते. परंतु, त्यांच सामनाच्या पहिल्या पानावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरात झळकली आहे. यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येते आहे. या पार्श्वभमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरच निशाणा साधला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळे प्रकल्प गुजरातला पळवून नेण्याचे काम सुरु आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ढिमपणाने ते बघत बसले आहेत. राज्यातील सर्व सुशिक्षित तरुणांची निराशा झाली आहे. वेदांता-फॉक्सकॉन आला असता तर ४ लाख लोकांना रोजगार मिळाला असता. महाराष्ट्र सरकारने गुजरातची चाकरी करण्याचे ठरवले आहे, असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
महविकास आघाडीने अनेक भरती बाबत निर्णय घेतले होते. सगळे प्रस्ताव पाठवून सुद्धा हे सरकार अडथळे आणत आहे. पोलीस भरती देखील व्हायला पाहिजे होती. पण, तिथेही अडथळा आणला. या सरकारचा आत्मविश्वास कमी झाला आहे. महाराष्ट्रामध्ये यांचे गुजरातपुढे काही चालत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हतबल झाले आहेत, अशीही टीका त्यांनी केली आङे.
सामनाच्या मुखपृष्ठावर शिंदे-फडणवीस सरकारच्या योजनेची जाहिरात आल्याने टीका करण्यात येत आहे. यावर बोलत असताना ते म्हणाले, सामनाच्या मुखपृष्ठवर जाहिरात आहे. सगळे वर्तमानपत्र चालवण्यासाठी कोणी जाहिरातदार आला आणि ५, १० लाख रुपये दिले तर कुठले वर्तमानपत्र ते टाळेल. कोट्यवधी रुपये जाहिरातीला सरकार खर्च करणार असेल तर कुठला वर्तमानपत्र नाही म्हणेल. पण पहिले पान उलटल्यानंतर आतील पानात जे वाचलं तर पहिला पानाच्या जाहिरातीवरची किंमत शून्य होते. सामनाला जाहिरात देण्याआधी सरकारने डोकं ठिकाणावर ठेवलं पाहिजे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी टीका केली आहे.
रवी राणा आणि बच्चू कडू वाद संपण्याचे काही नाव घेताना दिसत नाहीये. यामुळे बच्चू कडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. यावर जयंत पाटील यांनी खोक्याची वाटणी हाच प्रश्न असेल. कोणी दिले कोणी घेतले असेल तर बंद खोलीत जाऊनच चर्चा करावी लागेल, अशी टोला लगावला आहे.