Devendra Bhuyar : मातोश्रीवरील दोन बडवे मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाही
नागपूर : मुख्यमंत्री भेटण्यासाठी वेळ देत नाही, असा आरोप सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर होतो. यावर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी अखेर उत्तर दिले असून आहे. अशात मातोश्रीवर दोन बडवे आहेत जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटू देत नव्हते, असा थेट आरोप अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी केला आहे.
देवेंद्र भुयार म्हणाले की, मुंबईत उद्या सिल्व्हर ओकवर बैठक आहे. त्या बैठकीसाठी मी जातो आहे. मी गुहाटीला जाणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि मला कितीही प्रलोभने दिली तरी मी त्यांच्यासोबत जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केली आहे त्यांचा आरोप खरा आहे की मुख्यमंत्री हे वेळ देत नव्हते आणि ही नाराजी मी पहिल्यांदा बोलून दाखवली होती. त्यासाठी हे पाऊल उचलण्याची गरज नव्हती, असेही ते म्हणाले. हे वादळ दोन दिवसात शांत होईल आणि सरकार पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त करत बंड पुकारले आहे. यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संवाद साधत बंडखोरांना भावनिक आवाहन केले. आधी प्रशासनाचा अनुभव नसतांना मी मुख्यमंत्रीपद सांभाळले. त्याचवेळी कोरोना आला. त्याकाळात उल्लेखनीय कामे केली. त्याची दखल घेतली गेली आणि पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले. माझ्यावर एक आरोप होत आहे की, मुख्यमंत्री भेटत नव्हते. हे गेल्या काही दिवसांपुर्वी बरोबर होते. परंतु, त्यानंतर मी भेटायला सुरुवात केली होती. परंतु, त्यावेळेस मी भेटत नसतांना कामे कधीही थांबली नव्हती, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच, शिवसैनिकांनी सांगावे मी पक्षप्रमुखपद सोडेल. फक्त शिवसैनिकाने समोर येऊन सांगावे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.