वंदे भारतच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाही, आता दणका दाखवणार; जलील आक्रमक
छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून शनिवारी वंदे भारत रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. परंतु, वंदे भारत रेल्वेच्या उदघाटनाला खासदार इम्तियाज जलील यांना आमंत्रण दिले नाही. यावर जलील यांनी जाहिर नाराजी व्यक्त करत वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं नाही आता दणका दाखवणार, असा इशाराच सरकारला दिला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, औरंगाबादचा खासदार असताना रेल्वे आणि हवाई संपर्कासाठी मी लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले होते. आता हे घडत असताना निमंत्रण यादीत माझे नाव टाकायला ते सोयीस्करपणे विसरतात. मला त्याची फारशी पर्वा नसली तरी विकासाच्या मुद्द्यावरही हे गलिच्छ राजकारण का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
जालन्यातून गाडी सुरू होते पण त्यांनी परभणीच्या खासदाराचे नाव जोडले तर औरंगाबादच्या खासदाराचे नाव का नाही? घाणेरडे राजकारण करता येत असेल तर उद्या मीही गलिच्छ खेळ खेळेन तयार करा, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
दरम्यान, आत्मनिर्भर भारत अंतर्गत वंदे भारत ट्रेन बनवण्यात आली असून पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवला आहेत. ही ट्रेन जालन्याहून सात तासाच्या आत मुंबईला पोहचणार आहे. वंदे भारतमुळे मराठवाड्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.