Imtiaz Jaleel : युती तुटल्याचा फटका जनतेला का?
पंचवीस वर्षे एकमेकांसोबत असलेल्या शिवसेना आणि भाजपाने युती तोडली. दोन्ही पक्षांच्या तुटलेल्या युतीतील वादाचा फटका महाराष्ट्रातील जनतेला का बसावा, असा प्रश्न एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे. युती तुटल्याने पक्षांमधील वादाचा फटका जनतेला बसत आहे. याचा त्रास जनतेने सहन कारावा, असा सवाल जलील यांनी विचारला आहे.
खासदार इम्तियाज जलील हे आज लोकसभेत वित्त विधेयकावरील चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी जलील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीच हा मुद्दा उपस्थितीत केला व आपले परखड मत मांडले.
केंद्र शासन विविध फंडांमधून पैसे मिळाल्याचे सांगत आहे. मात्र महाराष्ट्राला जीएसटीचे २८ हजार कोटी अजूनही केंद्राकडून मिळालेले नाहीत, असे नमूद करत युती तुटल्याचा कसा फटका महाराष्ट्राला बसतोय, त्याकडे जलील यांनी लक्ष वेधले.
शिवसेना-भाजप युती ही महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून कायम होती. आता सत्तेसाठी संघर्ष होवून दोन्ही पक्ष वेगवेगळे झाले आहेत. ही युती तुटल्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला हक्काचा पैसा दिला जात नाही, असे स्पष्ट दिसत आहे. याचा फटका महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. तुमची युती तुटली, यात राज्यातील जनतेची काय चूक आहे, असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला.