जलील यांचे नामांतराविरोधाचे आंदोलन स्थगित; म्हणाले, दोन समाजामध्ये तेढ...
सचिन बडे | छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर नामांतराच्या विरोधामध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी पुकारलेले आंदोलन आता माघारी घेतले आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये. तसेच दोन्ही समाजाने समजदारीची भूमिका घ्यावी, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले आहे. तसेच खासदार इम्तियाज जलील यांना शिवीगाळ ऑडिओ प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस आयुक्तांनीच कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
औरंगाबादचा संभाजीनगर नामांतर विरोधात एमआयएमचा गेली 14 दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन स्थगित करण्यात येण्याची घोषणा इम्तियाज जलील यांनी केली आहे. आमचा आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू होतं. लोकशाही मार्गाने सुरू होतं. मात्र, गेली काही दिवस नामांतराच्या या मुद्द्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही संघटनांकडून सुरू असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.
रविवारी हिंदू समाजाचा एक मोर्चा आहे. त्यामध्ये बाहेरून काही लोक बोलवण्यात येत आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याच्या केसेस आहेत. ही अशी लोक येऊन शहराचा वातावरण खराब करतील म्हणून आम्ही आगळीक करत आमचं लोकशाही पद्धतीने सुरू असलेला आंदोलन स्थगित करत आहोत, असंही जलील म्हणाले. आता शहरात शांतता ठेवण्याचं काम पोलिसांचे आहे म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेतली, असेही जलील म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी मनसेने आंदोलन केलं त्यातूनही बाहेरून लोक आणले होते आणि वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला. हे शहर आपलं आहे कोणी बाहेरून येऊन वातावरण बिघडवू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही आमच्या आंदोलनाला स्थगिती दिली असल्याचं जलील यांनी सांगितलं.
आमचा मुद्दा हिंदू मुस्लिम कधीही नव्हता आमचा आंदोलन ऐतिहासिक नाव बदलाच्या विरोधात आहे आणि आता पुढची लढाई कोर्टात लढणार आणि आपल्या शहरासाठी सगळ्यांनी शांतता ठेवावी असा आवाहन इम्तियाज जलील यांनी केलं.
सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांचे ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. यात ते आमच्या बाबत वादास्पद बोलताय याबाबत पोलिस आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी मी त्यांना केली आहे. ते एका मुस्लिम बहुल एरियात पोलीस निरीक्षक आहे त्यांची मुस्लिम समाजाबाबत ही मत असेल तर हे चूक असल्याचेही जलील यांनी म्हंटले आहे.