Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

शिवसेनेची भूमिका नक्की काय आहे रिफायनरींबाबत? रत्नागिरीमधील राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मु्द्दे

माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या ह्या लोकांना एकदा धडा शिकवाच.
Published by :
Sagar Pradhan
Published on

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावात सरकारने रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित केला आहे. मात्र, या प्रकल्पावरून सध्या रत्नागिरीत प्रचंड वातावरण तापलेले आहे. त्यातच दुसरीकडे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज रत्नागिरीत सभा पार पडली. या प्रकल्पाबाबत राज ठाकरेंची काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर, रत्नागिरीच्या सभेतून राज ठाकरेंनीही बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. सोबतच अनेक वेगळ्या विषयावर देखील त्यांनी भाष्य केले.

Raj Thackeray
महाडमध्ये उध्दव ठाकरे पुन्हा भाजप- शिंदे गटावर बरसले; वाचा संपूर्ण भाषण जशास तसं

माझी महाराष्ट्र सैनिकांना हात जोडून विनंती...

आजच्या सभेला येताना एका शाखाध्यक्षांच्या गाडीला अपघात झाला आहे. हे दुःखद आहे. सभा जाताना आणि एकूणच गाड्या शांतपणे चालवत जा. माझी महाराष्ट्र सैनिकांना हात जोडून विनंती की जाताना गाडी शांतपणे चालवा आणि सीटबेल्ट लावा. अशी विनंती त्यांनी आज झालेल्या अपघातामुळे कार्यकर्त्यांना केली.

शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण...

महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती कळतच नाही. काही आमदार समोर आलं की विचारावंस वाटतं सध्या कुठे? आणि दुसरीकडे राजीनाम्याचा गोंधळ सुरु होता तो काल संपला. माझं असं मत आहे की शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल, म्हणून राजीनामा मागे घेतला असणार. असे भाष्य त्यांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर केले.

काम नाही केलं तरी निवडून देणार आहेतच मग कशाला

कोकणाची दुर्दशा झाली आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात. कोकणातले राजकारणी म्हणजे व्यापारी आहेत, अशांना तुम्ही परत परत निवडून देणार असाल तर काय वेगळं होणार. मुंबई-गोवा महामार्गाच काम २००७ ला सुरु झालं पण तरीही अजून काम पूर्ण नाही झालेलं कारण निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना माहीत आहे की काम नाही केलं तरी निवडून देणार आहेतच मग कशाला कामं करायची. अशी टीका त्यांनी केली.

फडणवीसांना फोन केला मग नितीन गडकरींना फोन केला

मागच्या वेळेला मुंबई-गोवा हायवेवरून रस्त्याची दुर्दशा पाहून मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला मग नितीन गडकरींना फोन केला आणि रस्त्याची काय अवस्था आहे हे सांगितलं तर ते म्हणाले की कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. मला सांगा एकही लोकप्रतिनिधी विचारतोय का, की कॉन्ट्रॅक्टर का पळून गेला? समृद्धी महामार्ग ४ वर्षात झाला मग १५ वर्षांत मुंबई गोवा महामार्ग का नाही झाला? असे बोलत त्यांनी सवाल केला.

लोकप्रतिनिधींना माहीत असतं कुठे प्रकल्प येणार ते...

आपल्या पायाखालून जमीन निघून जात आहे तरी कोकणातील माणसाला कळत कसं नाही की शेकडो एकरांचे व्यवहार होत आहेत ते. लोकप्रतिनिधींना माहीत असतं कुठे प्रकल्प येणार ते, मग तेच जमिनीचे व्यवहार करून हजारपट नफा कमवतात. लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र तुमच्याकडून कवडीमोलाने जमीन घेतात आणि सरकारकडून भरमसाट पैसे घेतात. आणि ह्यावर कोणीही बोलत नाही. असा आरोप त्यांनी केला.

भारतरत्नांपैकी ६ भारतरत्न ही कोकणातून

कोकण ही प्रतिभावंतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या भारतरत्नांपैकी ६ भारतरत्न ही कोकणातून आहे. इतक्या प्रतिभावान कोकणी माणसाला काय झालं आहे? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आक्रमक समुद्रमार्गाने येतील आणि इथल्या जमिनी घेतील म्हणून महाराजांनी आरमार उभारलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं ते पेशव्यानी पूर्ण केलं ते म्हणजे आपला भगवा झेंडा अटकेपार फडकवला म्हणजे कुठे थेट पाकिस्तानमधल्या अटक किल्ल्यापर्यंत फडकवला. म्हणजे काय केलं तर जमीन ताब्यात घेतली. थोडक्यात जमिनीचं महत्व कमी लेखू नका. असेही ते म्हणाले.

मी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेन असं वाटतं तुम्हाला?

दाभोळला एनरॉनच्या वेळेस असो, जैतापूर असो, नाणार आणि बारसू असो इथल्या जमिनी अमराठी लोकांनी घेतल्या आणि अव्वाच्यासव्वा भावाला सरकारला विकल्या. तो गब्बर श्रीमंत झाला. आणि माझा कोकणी माणूस तसाच राहिला. ह्याचं मला खूप वाईट वाटतं,राग येतो. २०१४ च्या आधी तेंव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार अशी घोषणा केली. मी त्यावर काय बोललो हे लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आवई उठवली की म्हणे राज ठाकरेंचा ह्या पुतळ्याला विरोध आहे. मी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेन असं वाटतं तुम्हाला? बरं हे बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार हे महाराजांचं नाव घेत नाही आणि हे मला बदनाम करणार. माझा मुद्दा इतकाच होता की महाराजांच्या समुद्रातील पुतळ्यावर १०,००० कोटी रुपये खर्च करणार त्यापेक्षा महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले हे महाराजांचं खरं स्मारक आहे, त्यांचं आधी संवर्धन करा हे माझं म्हणणं होतं. पण माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला. असा आरोप त्यांनी केला.

कोणताही मोठा प्रकल्प किंवा युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही

इथल्या लोकप्रतिनधींना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही, हे विसरू नका. कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की आपले शत्रू समुद्रमार्गाने येतील. त्यामुळे समुद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. पण आपण दुर्लक्ष केलं. २६/११ चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. १९९२ च्या बॉम्बस्फोटात वापरलेलं आरडीएक्स पण समुद्र मार्गाने आलं होतं. पण आपण महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलंय आपण. बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंच जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प किंवा युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही. कातळशिल्पांच्या आसपास ३ किलोमीटरपर्यंत कुठलाही विकास प्रकल्प करता येणार नाही. बारसूच्या रिफायनरी साईटच्या परिसरांत कातळशिल्प आहेत, म्हणजे इथे रिफायनरी होऊच शकत नाही. त्यामुळे माझी कोकणातील बांधवाना विनंती आहे की तुम्ही ह्यापुढे जमीन विकू नका. असा सल्ला देखील त्यांनी दिला.

तुम्हाला फसवणाऱ्या ह्या लोकांना एकदा धडा शिकवाच

शिवसेनेची भूमिका नक्की काय आहे रिफायनरींबाबत? खासदार म्हणतात होणार नाही, पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसं होईल. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेंव्हा जनतेला विचारलंत? शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे. इथल्या जमिनी हड्पणे, त्यातून बक्कळ पैसा कमवणं इतकंच इथल्या लोकप्रतिनिधींचं उद्दिष्ट आहे हे विसरू नका. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या ह्या लोकांना एकदा धडा शिकवाच. असे त्यांनी आवाहन कोकणवासीयांना केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com