मी जे शब्द बोललो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीय- अब्दुल सत्तार
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे मागील काही काळापासून आपल्या विधानाने चांगलेच चर्चेत आले आहे. आज तर मंत्री सत्तार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. सत्तारांच्या या विधानाने राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. त्यावरूनच राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहे. सत्तारांविरोधात अनेक ठिकाणी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर वाद उफाळल्यानंतर आज सिल्लोड येथील सभेत सत्तार यांनी भूमिका मांडली. पण यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. तसेच आपण टीका करताना वापरलेल्या शब्दांबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त केली. असा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
काय म्हणाले सिल्लोडमध्ये सत्तार?
आजच्या वादग्रस्त विधानानंतर सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा होती. या सभेत बोलताना सत्तार म्हणाले की, मी आज जे वक्तव्य केले की, मी बोललो की कोणत्याही महिला भगिनी किंवा पक्षाच्या भावना दुखवायचा आमचा हेतू नव्हता. आमच्या लोकांना जे बदनाम करतात, त्यांच्याबद्दल मी जे शब्द बोललो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीय”, असे विधान त्यांनी यावेळी बोलताना केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्वांचे रक्षक आहेत. सर्वांना न्याय देणारे आहेत. अन्याय करणारे नेते आमच्याकडे नाहीत. पण वेगळा अर्थ करुन लोकं त्याचीही चर्चा करतात. काही लोकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कुणीही अपशब्दात बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही कधीही माफ करणार नाहीत. यासाठी तुम्हालाही सर्वांना मैदानात उतरावं लागेल. ते यासाठी उतरावं लागेल की, आपण सर्वांचा सन्मान करतो, असे आवाहन देखील सत्तारांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
या इतक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत, हजारोंच्या संख्येने उपस्थित आहेत, मी आज एक वक्तव्य केलं. आमच्याबद्दल खोके-खोके असे आरोप केले जात आहेत. कोणी मायचा लाल असा नाही की आमच्या आमदाराला खरेदी करु शकतो. त्यांना कुणीही खरेदी करु शकत नाही. सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या विश्वासावर उठाव केला ते कुणाच्या भीतीमुळे केला नाही. शिवसेना जीवंत राहावी यासाठी उठाव केला. पण त्यांनाही बदनाम करण्याचं काम काही लोकं करु लागले आहेत असे यावेळी सिल्लोडमधल्या भाषणात सत्तार म्हणाले.