कसब्यात रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय; हेमंत रासनेंनी पराभव केला मान्य
पुणे : गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. कसब्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. कसब्यात 28 वर्षानंतर भाजपाचा पराभव झाला आहे. अद्याप निकाल अधिकृत घोषित झाला नसला तरी हेमंत रासने यांनी पराभव मान्य केला आहे.
कसब्याची पोटनिवडणूक शिंदे-भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरली होती. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी बड्या नेत्यांनी कसब्यात हजेरी लावली होती. सभा, प्रचार रॅली, आरोप-प्रत्यारोप, गौप्यस्फोटांमुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा 73 हजार 194 मतांनी विजय झाला. तर, हेमंत रासने यांना 62 हजार 244 मते मिळाली आहेत.
या पार्श्वभूमीवर हेमंत रासने यांनी प्रतिक्रिया दिला आहे. उमेदवार म्हणून मी कमी पडलो. पराभवाची कारणे शोधणार आहे. पक्षाने मला संधी दिली पण मी कमी पडलो. माझा पराभव मला मान्य आहे.
2019 मध्ये किंवा त्यापूर्वी निवडणुका तिरंगी पंचरंगी झाल्या. यंदा प्रथमच थेट लढत होती. त्यात उमेदवार म्हणून मी कमी पडलो, जनतेचा कौल मान्य आहे. मात्र, यापुढेही लोकांच्या सेवेसाठी सत्कार राहणार असल्याचे रासनेंनी सांगितले.