मध्यावधी निवडणुका लागणारच! भाजपमध्येच अंतर्गत संघर्ष सुरु : सुषमा अंधारे
विकास मिरंगे | मुंबई : महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम आणि मुंबईला महत्व कमी करण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोप शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. कर्जत येथे ठाकरे गटाचा मेळाव्यात त्या बोलत होत्या. तसेच, कामाला लागा, २०२३ मध्ये निवडणूका लागणार म्हणजे लागणार, असेही भाकीत त्यांनी वर्तविले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपला मुंबई टिकवण्यासाठी नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने भाजप राजकारण करत आहे येथील उद्योग सगळे गुजरातमध्ये नेण्याचं काम करत आहे. महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम आणि मुंबईचे महत्व कमी करण्याचे काम भाजप करत आहे.
भाजपमध्येच मोठ्या प्रमाणात अंतर्गत संघर्ष सुरू आहे. जे भाजपचे नेते त्यांना बाजूला ठेवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांचीच टीम करत आहे. त्यामुळे भाजपमध्येच नेत्यांवर अन्याय होत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, शिंदे गटाच्या मतदारसंघावरही भाजपने डोळा ठेवला आहे. शिंदे गटाच्या मतदारसंघात भाजपचे नेते जात आहेत. भाजप त्यांच्यावर दबाव ठेवत असल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान, याआधीही सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे भाकीत वर्तविले होते. 2023 ला मध्यवती लागतील. कारण भाजप व शिंदे गटात धुसफुस सुरू आहे. बाहेरून आलेल्यांना स्पेस दिला जातो यातून खदखद सुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग नाराज आहे याचे परिणाम भाजपला भोगावे लागणार आहे. शिंदे गटातही मंत्री पदाची आमिषे पूर्ण होत नाहीत. संजय शिरसाट नाराज आहेत. तसेच इतरही नाराज आहेत, असेही त्यांनी सांगितले होते.