हसन मुश्रीफांनी सोडले सरकारी निवासस्थान; बंगला सोडताना रुग्णांची पावले झाली जड
सतेज औंधकर |कोल्हापूर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सव्वा महिन्याने मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील माजी मंत्र्यांनी आता सरकारी बंगले रिकामे करण्यास सुरुवात झाली आहे. माजी ग्रामविकास आणि कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतील सरकारी बंगला रिकामा केला. बंगल्यात राहणारे रुग्ण आणि नातेवाईकांनी भावुक निरोप घेतला.
राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे माजी ग्रामविकास आणि कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतील सरकारी बंगला रिकामा केला. कोल्हापूर जिल्ह्यातून गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी मुंबईत येणाऱ्या शेकडो रुग्णांच्या निवासाची सोय याच बंगल्यात केली जात असे. जिल्ह्यातील रुग्णांसाठी मंत्री मुश्रीफ यांचा हा बंगला म्हणजे ‘हक्काचे घर’ होते.
मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्याने मंत्र्यांना मिळणारा हा बंगला आमदार हसन मुश्रीफ यांना रिकामा करावा लागला. त्यामुळे या बंगल्यात मुक्कामी असणारे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जड पावलांनी तिथून बाहेर पडले. यावेळी त्यांनी आमदार मुश्रीफ यांचे आभार मानले.
तर, मंत्रीपद नसताना मादार निवासावर रुग्णांची सोय करण्यात येते. परंतु, आमदार निवासातील खोली मिळायला काही वेळ जाणार आहे. दरम्यानच्या काळात ही रुग्णसेवा खंडित करावी लागेल, याची खंत मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शिंदे सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असली तरी अद्याप खातेवाटर झालेले नाही. तर, या मंत्रिमंडळावर विरोधकांसह सरकारमधील नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.