"अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर ठरलेल्या गोष्टी हर्षवर्धन पाटील यांनी पाळाव्यात", आप्पासाहेब जगदाळे म्हणाले...
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर मधून तुतारीची उमेदवारी देण्यास आमचा कोणताही विरोध नाही, पण विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासमोर 2019 साली अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या गोष्टी त्यांनी आता पाळाव्यात, असे विधान इंदापूरचे आप्पासाहेब जगदाळे यांनी आज अकलूज येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर कोणत्या गोष्टी ठरल्या होत्या याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. दरम्यान आप्पासाहेब जगदाळे, दशरथ माने यांच्यासह काही जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. आज आप्पासाहेब जगदाळे, दशरथ माने अकलूज येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्यासाठी आले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 2019 मध्ये अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासमोर ज्या काही गोष्टी ठरल्या होत्या त्या गोष्टी आता हर्षवर्धन पाटील यांनी पाळाव्यात आमचा त्यांच्या उमेदवारीला व पक्षात येण्यास विरोध नाही.
आम्ही गेले अनेक वर्ष शरद पवारांच्या सोबत काम करत आहोत. जुन्या कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी आमची मागणी आहे. हर्षवर्धन पाटील पक्षात आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू त्यांनी पाच वर्षे पक्षात राहून काम करावं आम्हाला त्यांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी हीआप्पासाहेब जगदाळे यांनी केली आहे. यामुळे आता हर्षवर्धन पाटील तुतारी कडून लढणार की अपक्ष म्हणून मैदानात उतरणार याकडेच इंदापूरच्या जनतेचे लक्ष लागले आहे.