धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने दुःखी : गुलाबराव पाटील
जळगाव : निवडणुक आयोगाने शिवसेनेला धक्का देत धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. यावर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याचे दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, दोन्हीही गटाची धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी होती. मात्र, चिन्ह मिळालं नाही याचं आम्हाला दुःख आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानावर बैठक बोलावली असून या बैठकीत नवीन चिन्ह निश्चित होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. तर, निवडणूक आयोगाचा निर्णय हा तात्पुरत्या स्वरूपाचा असला तरी नवीन चिन्हासाठी मात्र दोन्हीही पक्ष तयारीला लागले असल्याचे मतही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
तसेच, शिवसेना संपली असे आम्ही कधी म्हणत नाही. मात्र, ताकतीच्या आधारावर पाहिलं तर दसरा मिळाव्यात कुणाची ताकद वाढली हे सिद्ध झाले, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना संपायची असती तर आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो असतो. त्यामुळे कोणी काही म्हणत असलं तरी बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवली असल्याचे म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, आगामी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिंदेगट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाचा हा निर्णय हंगामी असला, तरी त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. निवडणुक आयोगच्या निर्णयाविरोधात शिवसेना थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.