खेकड्यांना चांगलं सांभाळलं असतं तर...; गुलाबराव पाटलांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा
मुंबई : माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. तर खेकड्यांनी फोडले आहे, असा निशाणा उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर साधला आहे. ठाकरे गटाने सुरू केलेल्या 'आवाज कुणाचा' या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो प्रसारिक करण्यात आला आहे. यादरम्यान उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र डागलेले दिसते. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.
ज्याला कावीळ झालेली असते, त्यांच्यासाठी खेकडा हा प्राणी फार गुणकारी असतो. त्याला चांगलं सांभाळलं असतं तर कदाचित धरणच फुटलं नसते, असा जोरदार टोला गुलाबराव पाटलांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला मुजरा करायला जातात, उद्धव ठाकरेंच्या या टीकेवरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री कुटुंबासह पंतप्रधानांना भेटायला गेले होते. त्याला मुजरा मारणं म्हणत असाल तर ती चुकीची बाब आहे. मागच्या काळात आपणही त्यांना भेटायला जात होतात. पण आम्ही म्हणणार नाही की, आपण मुजरा मारायला जात होतात, असा पलटवारही त्यांनी उध्दव ठाकरेंवर केला आहे.
दरम्यान, आवाज कुणाचा या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरेंची मुलाखत दोन भागात प्रसारित होणार आहे. संजय राऊतांनी ही मुलाखत घेतली असून याचा प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला आहे. आम्ही खंजीर खुपसला, मग राष्ट्रवादीने काय केले की तुम्ही त्यांच्यासोबत गेलात, असा सवाल त्यांनी विचारला आहे.