...त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडून गेलो; गुलाबराव पाटलांनी स्पष्टच सांगितले
जळगाव : उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना त्यांना हात पाय जोडून विनंती केली होती. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना सोडून गेलो, असा पुनरुच्चार पुन्हा एकदा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते जळगावमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
आपल्यातला एक मराठा चेहरा आपल्यापासून लांब जात असून तो जाता कामा नये हे उद्धव ठाकरेंना आधी समजावलं होतं. तसेच उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना हातपाय जोडून त्यांना विनंती देखील केली होती. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने नागपूरपासून दादर पर्यंत सर्व गेले. त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदार संघाचा विकास करू शकलो नसतो. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना सोडून गेलो, असे गुलाबराव पाटलांनी म्हंटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये जलद गतीने कामे करू शकलो नाही. मात्र, आता मूळ कामे सुरू झाली असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री सात महिन्यात पाच वेळा जळगाव जिल्ह्यात येणारे एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात सगळेच लोक डाऊन होते. कारण स्वतः उद्धव ठाकरे लॉकडाऊन मंत्री होते, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे.
कामाला उत्तर द्या व कामानेच बोला शेतकऱ्यांना व जनतेला काम हवय. बोलबच्चन अमिताभ बच्चन नको. त्यामुळे खोके बोलून विकास होत नाही तर खोक्यांचा विकास झाला पाहिजे, खोके देऊन लोकांची काम केल्या गेली पाहिजे आणि ते काम मी करत असल्याचे म्हणत विरोधकांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.