संजय राऊतांनाच विचारा डिल झालेले पैसे कुठं ठेवलेत; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा
सचिन बडे | औरंगाबाद : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. या निर्णयामुळे ठाकरे गटात आणि शिंदे गटात वाद आता आणखीच तीव्र झाला आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा केल्याचा मोठा आरोप केला आहे. यावर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊतानांच विचारा डील झालेले पैसे कुठे ठेवले? नोटा किती होत्या, असा निशाणा गुलाबराव पाटलांनी साधला आहे. तसेच, ते सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत याबाबच विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले, जाऊ द्या, असं म्हणत खिल्ली उडविली.
गुलाबराव पाटील आज औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले असता त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. या दौऱ्यात पाणीपुरवठा संदर्भात अनेक तक्रारी ऐकून निकाली काढण्यात येतील. तसेच जे काम करत नसतील त्यांना सुट्टी देण्यात येईल, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी एक ट्विट करत शिंदे गटावर आणि भाजपवर मोठा आरोप केला आहे. माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असेही राऊतांनी म्हंटले होते.