'दादा होता तेव्हा दर शुक्रवारी हक्काने कुठल्याही पक्षाचा माणूस आला तरी काम व्हायचं'
supriya sule : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील जोरदार राड्याने झाली. विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे केले जातात आणि विधेयके मांडून निर्णय घेतले जातात, त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू-तू मैं-मैं झाल्याचं दिसलं. यावरच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मला आजचा गोंधळ पाहून धक्का बसला. कोणत्याही विधीमंडळात आणि तेही महाराष्ट्रात घडणं अत्यंत दुर्दैवी आहे. अस म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले. (guardian minister to maharashtra and pune supriya sule)
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, वैचारीक लढाईत सत्तेत असलेल्या आमदाराने दुसऱ्या पक्षाच्या आमदाराला धमकी देणं, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. तसेच मी देव पाण्यात घालून बसलेय. आमच्या महाराष्ट्राला आणि पुणे जिल्ह्याला एक पालकमंत्री द्या. मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय. दोन महिने झाले पालकमंत्री नाहीये. दादा होता तेव्हा दर शुक्रवारी हक्काने कुठल्याही पक्षाचा माणूस आला तरी काम व्हायचं.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, जे काही घडलं ते केवळ ट्रेलर होता आणि पिक्चर अजून शिल्लक आहे. आम्ही भाजपाच्या आमदारांसोबत घोषणाबाजी करत होतो. त्यावेळी महाविकास आघाडीचे आमदार आमच्यावर चाल करून आले. आम्ही दिलेल्या घोषणा त्यांना चांगल्याच झोंबल्या. त्यांनी तसे करायला नको होते. गेले दोन दिवस ते लोक घोषणा देत आहेत, त्यावेळी आम्ही त्यांना काहीही केले नाही. मग आज आम्ही घोषणाबाजी करताना मुद्दाम मध्ये येऊन आमच्यावर चालून येण्याची काय गरज होती? असा सवास भरत गोगावले यांनी केला आहे.