राज्यपालांनाही महाराष्ट्रातून जायचंय, म्हणूनच ते मुद्दाम बोलतायत का : अजित पवार
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन राजकीय वातावरण चांगलेत तापले असून विरोधकांनी आंदोलनाचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. अशात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे. राज्यपाल देखील खाजगीत संगतात की, त्यांना त्यांच्या राज्यात परत जायचे आहे. त्यामुळे ते मुद्दाम बोलतायत का असा प्रश्न पडतो, असे त्यांनी म्हंटले आहे.
पत्रकारांनी अजित पवारांना महापुरुषांच्या विषयावर राज ठाकरेंनी तुमचं ऐकलं का? अशी विचारणा केली. यावर ते म्हणाले की, पालिका निवडणूका लांबल्याने लहान कार्यकर्त्यांना त्रास होतोय. निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत. नुसत्या तारीख पे तारीख जाहीर होत आहेत. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हे सुरु आहे. राज ठाकरेंचे विचार त्यांच्यासोबत माझे विचार माझ्यासोबत. आम्ही स्पष्टपणे बोलतो. आमच्या ओठात एक आणि पोटात एक अशी भावना कधीच नसते. हे सर्वांना महिती आहे. यामुळे कधी कधी आम्ही जे बोलतो ती पक्षाची भूमिका नसते.
कोणीतरी काहीतरी बोलते आणि बेरोजगारी , शेतकऱ्यांचे वगैरे मुद्दे मागे पडतात आणि इतर विषयांवर चर्चा सुरु होते. राज्यपाल देखील खाजगीत संगतात की, त्यांना त्यांच्या राज्यात परत जायचे आहे. त्यामुळे हे सगळे सुरु आहे का? ते मुद्दाम बोलतायत का असा प्रश्न पडतो. राज्यपालांची नेमणूक जे करतात त्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
सीमाभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारने तरतुद करावी. आमच्यावेळी अशी मागणी झाली असती तर आम्ही तरतूद केली असती. तर, याआधी अनेकदा नोकरभरती झाली. पण, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कधी नियुक्तीपत्रे दिली नाहीत. अलीकडच्या काळात अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे रोष कमी व्हावा यासाठी हे सर्व होत आहे. ही नौटंकी बंद व्हावी, अशा शब्दात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे.
फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले त्याचा शोध मी घेणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर सगळ्याचा शोध घ्या. एकदा दुध का दुध- पाणी का पाणी होऊ द्या, असे आव्हान अजित पवारांनी दिले आहे.