राज ठाकरे यांचे मत हेच माझे मत : गोपीचंद पडळकर
मुंबई : छत्रपती शिवरायांचा अवमान हा जातीय राजकारणासाठी केला जात आहे. या सर्वांची सुरुवात राष्ट्रवादीने केली, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जातीपातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम शरद पवार करत आहेत. राज ठाकरे यांचे मत हेच माझे मत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, जातीपातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. हे काय नव्याने लोकांच्या समोर येत नाहीय. हा अनेक वर्षांपासूनचा विषय आहे. जातीपातीच्या लोकांचा मतासाठी वापर करायचा. आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचे त्यानं तोंडी लावायला काहीतरी द्यायचं. मनमानी आणि नात्यागोत्याचे राजकारण करायचं आणि प्रस्थापित लोकांना मोठं करायचं हे त्यांनी केलं आहे. राज ठाकरे यांचे मत हेच माझे मत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
तर, मी वयाच्या २२ व्या वर्षापासून कार्यकर्ता म्हणून फिरतो आहे. विद्या चव्हाण यांनी माहिती घ्यायला हवी. एमपीएससीबाबत आज चर्चा झाली. पाच आमदार आज या संवादमध्ये सामील होते. एमपीएससीला खूप स्पर्धा आहे म्हणून तुम्ही नैराश्यात जाऊ नका. एमपीएससीचा विद्यार्थी गावाकडे येऊन सभापती झाला तर वाईट काय आहे. सोमवारी एमपीएससीबाबत एक बैठक घेणार आहोत. एमपीएससी सदस्य निवडीसाठी ओपन, एससी, एसटी, भटक्या विमुक्त जाती यांना प्राधान्य द्यावं, अशी आमची मागणी आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
सध्या जातीचं राजकारण सुरू असून या जातीय राजकारणाचा जन्म 1999 साली एनसीपीच्या जन्मापासून सुरू झाली. राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. मुस्लिम मते जाण्याची भीती वाटल्यानेच इतर टोळ्या उभ्या करण्यात आल्या. त्यातून फंडिग गोळा करण्यात आलं, असा जोरदार हल्लाबोल राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केली आहे.