औरंगाबाद अन् उस्मानाबाद नामांतरानंतर पडळकरांनी केली अहमदनगरच्या नामतंराची मागणी
राज्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना अशातच काल केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला अखेर मंजुरी दिली आहे. अनेक दिवसांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. त्यामुळे या केंद्र सरकारच्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होत आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. याच गोंधळादरम्यान, आता अहमदनगर शहराचे नामकरण करण्याची मागणी पुढे आली आहे. याबाबतची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
नेमकी काय आहे पडळकर यांची मागणी?
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे- फडणवीस सरकारचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले की, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात होणारच. अशी मागणी करत गोपीचंद पडळकर यांनी विश्वास व्यक्त केला.