गिरीश बापट पंचतत्वात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार
पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे पार्थिव अनंतात विलीन झाले. त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा, प्रकाश जावडेकर, श्रीरंग बारणे, उमा खापरे उपस्थित होते. यादरम्यान अमर रहे अमर रहे म्हणून कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
खासदार गिरीश बापट यांचे वयाच्या 72 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गिरीश बापट यांचे पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवास पोलीस बॅंडकडून मानवंदना देण्यात आली. यानंतर देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा, प्रकाश जावडेकर यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तर, सर्वपक्षीय नेत्यांकडून गिरीश बापट यांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.
दरम्यान, गिरीश बापट 1973 पासून राजकारणात सक्रिय होते. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. 1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले होते. मागील दीड वर्षांपासून गिरीश बापट आजाराशी लढा देत होते. उपचार सुरु असतानाही कसबा पोटनिवणुकीसाठी भाजपच्या मेळाव्यात पोहचले होते. अजातशत्रू, सर्वसमावेशक नेते म्हणून त्यांची ओळख होती.